Breaking News
Home / Featured / पाण्याचे संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज – अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील

पाण्याचे संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज – अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील

जलजागृती सप्ताहाला आजपासून सुरुवात

 

नागपूर, दि. 16 :

पाण्याचे संवर्धन व संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. जलजागृती सप्ताहानिमित्ताने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पाणी बचतीचे महत्त्व पोहचविणे आवश्यक आहे. पुढे भविष्यात पाण्याअभावी माणसावर संकट ओढावू नये म्हणून आजच पाणी बचतीचा मूलमंत्र प्रत्येकाने अंगीकारावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, सिंचन भवन येथे आजपासून जलजागृती अभियानाला सुरुवात झाली. या जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ‘लोक सहभागातून जलसमृद्धी’ ही संकल्पना घेऊन दरवर्षी 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो. या अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ब. रा. स्वामी, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अ. रा. कांबळे, अधीक्षक अभियंता जी. मो. शेख, डॉ पी. के. पवार, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे, सचिव प्रवीण महाजन, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता ल. प्र. इंगळे, भारतीय जल संसाधन संस्थेचे सह सचिव विवेक दीक्षित तसेच इतर कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील म्हणाले की, जगामध्ये पाणी मर्यादित स्वरुपात आहे. कृत्रिम स्वरुपात आपण पाणी तयार करु शकत नाही. यासाठी पाण्याचा अपव्यय व गैरवापर होणार नाही याबाबत त्यांनी दक्षता घ्यायला हवी, पाण्याचा पुनर्वापर करुन ते वापरण्यावर भर द्यावा. औद्योगिकीकरणामुळे आजकाल जल प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पाणीसाठा उपलब्ध असून देखील तो मानवी जीवनाला उपयोगी ठरणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ब. रा. स्वामी म्हणाले, मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व अंतरबाह्य आहे. निसर्गाने मानवाला जगण्यापुरते पाणी उपलब्ध करुन दिले आहे. परंतु मानवी हाव ही न संपणारी असल्यामुळे पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. आपल्या पुढील पिढीला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येकाने पाणी बचतीचे महत्त्व जाणावे व इतरांनाही सांगावे असेही ते यावेळी म्हणाले.

मान्यवरांच्या हस्ते विदर्भातील अकरा नद्यांचे पाणी एकत्रित करुन जल देवेतेची पूजा करण्यात आली. यामध्ये विदर्भातील कन्हान, पेंच, वेणा, वर्धा, वैनगंगा, खडकपूर्णा, बाघ, नळगंगा, इंद्रावती, बोर तसेच पूर्णा या नद्यांचे पाणी जल पूजनासाठी जलकुंभात एकत्रित करण्यात आले. जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थितांनी यावेळी जलप्रतिज्ञा घेतली तर श्रीमती उषा कोईली यांनी जलगीत गायले. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाधिकारी श्रीमती रश्मी तेलेवार यांनी केले. संचालन संजय खोंडे तर आभार श्रीमती उषा कोईली यांनी मानले.

About admin

Check Also

जगुआर एफ-टाइप को फोर-सिलेंडर पावरट्रेन से मिली शानदार चपलता और कार्यकुशलता

  जगुआर एफ-टाइप में टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इनजीनियम पेट्रोल इंजन लगाया गया एक असली जगुआर स्पोर्ट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!