Home / Featured / जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘टीच इन इंडिया’ची गरज – राज्यपाल

जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘टीच इन इंडिया’ची गरज – राज्यपाल

मुंबई, १० मार्च :
जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘टीच इन इंडिया’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

आयआयटी मुंबईचा ५९ व्या वर्धापनदिन आणि साठाव्या वर्षात पदार्पण केल्यानिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, संचालक मंडळाचे अध्यक्ष दिलीप संघवी, संचालक प्रा.देवांग खक्कर, माजी संचालक, विद्यार्थी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर ‘टीच इन इंडिया’ हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. एमआयटी आणि हॉवर्ड या नामांकित विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असतात. जगभरातील विद्यार्थी आपल्या देशाकडे आकर्षित व्हावे यासाठी देशात दर्जेदार शैक्षणिक संस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

आयआयटी मुंबईचा जगभरात नावलौकिक आहे.५२ हजारांहुन अधिक अभियंते व शास्त्रज्ञ या संस्थेने दिले आहेत. शिक्षण, संशोधन, उद्योग अशा विविध क्षेत्रात या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशातच नव्हे तर जगभरात आपला नावलौकिक निर्माण केला आहे. ब्रिक्स देशांच्या क्यू एस वर्ल्ड क्रमवारीत मुंबई आयआयटी नवव्या क्रमांकावर असल्याची बाब निश्चितच गौरवास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

आयआयटी मुंबईच्या अंतर्गत आणखी दोन कॅम्पस असण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी स्वतंत्र कॅम्पस असावे व त्यात महिलांसाठीचे अभ्यासक्रम असावेत आणि दुसरे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रासाठी कॅम्पस असावे. विदर्भ किंवा मराठवाड्यात हे कॅम्पस असावे. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

दरम्यान यावेळी ‘प्रो. एस सी भट्टाचार्य अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन प्युअर सायन्सेस’ हे प्रा. के.पी. कल्लीपन यांना तर ‘प्रो. एच.एच.माथूर’ पुरस्कार प्रा. बी. रवी आणि प्रा.अमित अग्रवाल यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी आयआयटी मुंबईच्या साठाव्या वर्षात पदार्पणाचा विशेष लोगो, नवीन पद्मविहार या अतिथीगृहाचे आणि पोस्टल स्टॅम्पचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी ‘आर्ट एक्सपो’ आणि ‘पोस्टर एक्झिबिशन’ला भेट दिली.

 

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!