Home / Trending / वीजमीटरचे रीडिंग चुकल्यास कारवाई – भालचंद्र खंडाईत

वीजमीटरचे रीडिंग चुकल्यास कारवाई – भालचंद्र खंडाईत

नागपूर, दि. 7 :

‘वीजग्राहकांच्या मीटरचे चुकीचे रीडिंग घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडत असल्याने चुकीचे रीडिंग घेतल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यास कुचराई करणा-या कुठल्याही बिलींग कर्मचा-याला पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट संकेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कामचुकार मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महावितरणने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे, वीजवापरानुसार योग्य व अचूक वीजबिल ग्राहकांना देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मीटर रीडिंगच्या प्रक्रियेत कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांवर कठोर कारवाई केल्या जाईल. असेही खंडाईत यांनी यावेळी सांगितले, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलातील सर्व वरिष्ठ अभियंते, मानव संसाधन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, वित्त व लेखा विभाग आणि जनसंपर्क विभागातील सर्व अधिका-यांच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

महावितरणच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसात समन्वय साधून कंपनीचे हित जपण्यासाठी काम करावे, दुसऱ्यांच्या चुकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकणारे कर्मचारी, अधिकारी यांना कदापि सहन केले जाणार नसल्याचे संकेत देतांनाच वसुली, वीज हानी बरोबरच बिलिंग विभागातील होणाऱ्या अनियमितता तसेच कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधत संबंधितावर मार्च अखेरीस कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांना त्यांनी दिले. कामचुकार आणि सतत गैरहजर असणा-या कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याच्या सूचना देतांनाच निलंबित केल्या जाणाऱ्या कर्मचारी किंवा अधिका-यांना मूळ वेतनाच्या केवळ 5 ते 10 टक्के भत्ता देण्यात यावा. त्यामुळे कामात चुका करून घरी मजा मारणाऱ्या वृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मानव संसाधन विभागातील कर्मचा-यांना यापुढे बायोमेट्रिक मशीनला केवळ शोभेची वस्तू न बनवता यापुढे यामशीन व्दारेच कर्मचा-यांची हजेरी घेऊन पगार काढण्याच्या सूचना देतांनाच त्यांनी बिलिंग बाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत बिलिंग विभागातील कर्मचा-यांनी डोळ्यात तेल घालून बिलिंग करावे तसेच दोन पेक्षा जास्त वेळा एकाच ग्राहकांचे बील दुरुस्त झाल्यास किंवा त्यात त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळला तर संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्यासाठी, वरिष्ठ अधिका-यांनी नियमितपणे उपविभाग, शाखा कार्यालयांना भेटी द्याव्यात व त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याला प्रादेशिक कार्यालयाला पाठवण्याच्या सूचनाही खंडाईत यांनी दिल्या.

बदली करण्यात आलेल्या मिटरच्या युनिट मध्ये मोठ्या प्रमाणात अनपेक्षित घट झाल्याचे दिसून आले, याबाबत प्रादेशिक कार्यालयाकडून तपासणीसाठी पथक पाठवले जाईल व त्यामध्ये चुकीचे मीटर बदली, किंवा हेतुपुरस्पर कंपनीचे नुकसान झाल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत देतांनाच वारंवार चुकीचे मीटर रिडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या बिलातून केवळ दंडाची रक्कमच कपात न करता त्या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून येत्या शनिवार पूर्वी सर्व उपविभागांनी ग्राहक क्रमांसकासहित एसएलसी, ओआरसी, मीटर रक्कम आदीची माहिती सादर करावी, चूकीची माहिती देणा-यांना जबाबदार धरण्याचा इशाराही खंडाईत यांनी दिला.

यावेळी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांनी एप्रिल पासून लागू होणाऱ्यां नवीन बिलिंग प्रणालीवर विस्तृत प्रकाश टाकला. तसेच होणाऱ्या खर्चात कपात करण्यासबंधिच्या परिपत्रकाचे उल्लंघन करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले. याशिवाय प्रभारी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित विविध विषयांवरील सादरीकरण केले. याप्रसंगी मुख्य अभियंते रफ़ीक शेख, सुहास रंगारी, अरविंद भादीकर, दिलीप घुगल, सुहास मेत्रे आणि सुरेश मडावी, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, आणि पाचही परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंत्यांसह मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, वित्त व लेखा आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी उपस्थित होते.

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!