Breaking News
Home / Featured / राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन साजरा

राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन साजरा

सत्तर वर्षाची गौरवशाली कारकीर्द

मुंबई, दि. ६ :

राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) ७० वा वर्धापनदिन गोरेगाव येथील एसआरपीएफ ग्राउंड येथे आज साजरा करण्यात आला. ६ मार्च १९४८ रोजी पुरंदर येथे स्थापना झालेल्या एसआरपीएफचे राज्यात १६ गट असून साधारण १८ हजार पोलीस कर्मचारी आहेत. राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणे, नक्षली कारवाया रोखणे यासह निवडणुका, सण – समारंभाच्या काळात एसआरपीएफ जवान महत्वाची भूमिका निभावतात. एसआरपीएफचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलही कार्यरत असून महापूर, भूकंप आदी आपत्तीकाळात हा दल बचाव तसेच पुनर्वसनाचे महत्वाचे कार्य करते.

एसआरपीएफच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे पोलीस महासंचालक सतिश माथूर, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप कर्णिक, राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक ८ चे समादेशक महेश घुर्ये आदी उपस्थित होते.

एसआरपीएफच्या विविध गटांनी यावेळी संचलन केले. गटांच्या शानदार संचलनात एसआरपीएफचा रेझींग डे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वच्छता चषक, फिल्ड क्राफ्ट डेमो चषक, स्मार्ट ऑफिसर स्पर्धा यातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले अधिकारी, कर्मचारी, राज्य आणि केंद्र शासनाचे पुरस्कार जाहीर झालेले अधिकारी, कर्मचारी, शहीद जवानांचे कुटुंबिय आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

 यावेळी एसआरपीएफच्या निशान टोळी, बँड पथक यांच्यासह गट क्रमांक १, २ आणि ४ यांनी आपले शानदार संचलन सादर केले. संचलन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसआरपीएफच्या वतीने स्वच्छता अभियानही राबविले जाते. यात चांगली कामगिरी करणाऱ्या एसआरपीएफच्या पुणे, धुळे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील गटांना यावेळी सन्मानित करण्यात आले. दिलीप तावरे, प्रमोद लोखंडे, गणेश पानसरे, बिश्वास बादल या अधिकाऱ्यांना यावेळी आदर्श अधिकारी म्हणून पोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल समादेशक महेश घुर्ये यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याशिवाय उल्लेखनिय कामगिरीबद्दल पी. एस. महाडीक, जी. एन. लोखंडे, प्रदीप वाघ यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

पोलीस महासंचालक सतिश माथूर यावेळी म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात एसआरपीएफचे योगदान फार मोठे आहे. पोलीस महासंचालनालयाकडून एसआरपीएफला आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा देण्यात येतील. आपले कर्तव्य बजावताना एसआरपीएफचे जवान स्वच्छता अभियान, गावांचा विकास, आरोग्य अभियान यांसारखे उपक्रमही राबवित आहेत. हे उपक्रम कौतुकास्पद असून त्यामुळे पोलीस दल आणि नागरीक यांमध्ये संवाद वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस वेल्फेअर योजनेतील विविध लाभ एसआरपीएफच्या जवानांनाही मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एसआरपीएफचे अपर पोलीस महासंचालक श्री. बिष्णोई यावेळी म्हणाले की, राज्यातील विविध भागातील एसआरपीएफ कँपच्या विकासासाठी पोलीस महासंचालनालयाकडून चांगला निधी उपलब्ध झाला आहे. सोयी सुविधांच्या निधीसाठी सुमारे १३३ कोटी रुपये मिळाले असून त्यातून एसआरपीएफ जवानांसाठी चांगल्या सुविधांची निर्मिती करण्यात येईल. पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडूनही एसआरपीएफच्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी सुमारे ९४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मार्गी लागल्या असून राज्यातील कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एसआरपीएफ यापुढील काळातही अधिकाधिक योगदान देत राहील, असे ते म्हणाले.

About admin

Check Also

जगुआर एफ-टाइप को फोर-सिलेंडर पावरट्रेन से मिली शानदार चपलता और कार्यकुशलता

  जगुआर एफ-टाइप में टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इनजीनियम पेट्रोल इंजन लगाया गया एक असली जगुआर स्पोर्ट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!