Breaking News
Home / Featured / चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – बाबा रामदेव

चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – बाबा रामदेव

जिल्हा परिषदेच्या कृषी मेळाव्याला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि.22 :

‘ खेत में वही डालो, जो पेठ में डाल सकते हो ’… असे आवाहन करत चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांनी वनौषधी करतांना सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करावा, असे आवाहन योगगुरु बाबा रामदेव महाराज यांनी केले. जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीला मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी संबोधीत केले.

चंद्रपूर तालुक्यातील मूल येथे 20, 21 व 22 असे तीन दिवस बाबा रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. मंगळवारी मुल येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. बुधवारी महिला मेळाव्याचे आयोजन चंद्रपूरमध्ये करण्यात आले होते. तर आज केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरीय कृषी मेळाव व प्रदर्शनीचे आयोजन केले होते.

या आयोजनाच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ समाज सेवक डॉ.विकास आमटे, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, नगराध्यक्ष ऐतशाम अली, स्वागता अध्यक्ष कृषी सभापती अर्चना नरेंद्र जिवतोडे, माजी मंत्री संजय देवतळे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, सभापती ब्रिजभुषण पाझारे, सभापती गोदावरी केंद्रे, राहूल सराफ, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या आयोजनाचे वैशिष्टये म्हणजे, जिल्हयातील शेतक-यांनी कोटयावधीचा व्यवसाय करणारे पतंजलीचे मार्गदर्शक बाबा रामदेव यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना आपल्या शेतातील विविध उत्पादीत वस्तू व त्यापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थाची मार्केटींग थेट त्यांच्यासोबत केली. रामदेव बाबा यांनी देखील शेतक-यांनी दिलेल्या विविध वस्तू स्वत:कडे ठेवून घेत. यातील उत्तम प्रतिच्या उत्पादनांना चांगली बाजार पेठ उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. या ठिकाणी अनेकांनी रामदेव बाबा यांना दाखविण्यासाठी दुधाळू जनावरेही आणली होती. रामदेव बाबा यांनी त्यांची पाहणी केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी भारत जोडो मोहीमेचे शिल्पकार स्व.बाबा आमटे यांना व्यासपीठावरुन अभिवादन केले. त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ समाजसेवी डॉ.विकास आमटे यांनी बाबांच्या नंतर समाज सेवेचव्रत त्याच तन्मयतेने सुरु ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमानंतर त्यांनी काही वेळ आनंदवन येथे घालवला. यावेळी आमटे कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
रामदेव बाबा यांच्या भाषणासाठी मोठया संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांनी कृषी आणि योग या दोन बाबींवर प्रबोधन केले. या परिसरातील जमिनीमध्ये शेतक-यांनी कोरफळ, गुडवेल, हळद, आवळा अशा वनौषधींचे पिक घ्यावे. मधुमक्षीपालन करावे, पतंजलीमार्फत तयार होणा-या विविध उत्पादनासाठी मोठया प्रमाणात वनौषधी लागत असून त्यासाठी सर्वांनी मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्यास योग्य भाव दिले जाईल, असे स्पष्ट केले. आपले जीवन हे या देशातील गरीबातील गरीब माणसाला आरोग्य संपन्न व समृध्द करण्यासाठी असून त्यामुळेच हाडाचा शेतकरी असणारे आपण शेतीत पिकणा-या वनौषधीला व सेंद्रीय धान्याला महत्व देतो. कारण आपण जे खाऊ शकतो, तेच शेतीमध्ये पेरल्या गेले पाहीजे. त्यांनी यावेळी विदर्भातील धान, दाळ याची खरेदी करण्याचेही संकेत दिले. याशिवाय सद्या महाराष्ट्रातील नेवासे परिसरात दुग्ध उत्पादनबाबत आपण प्रयत्न करीत असून गायीच्या दुधावरील उद्योगात लक्ष घालणार असून विदर्भात सर्व शेतक-यांनी दुध उत्पादनामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी यावेळी भाषणाच्यामध्ये अर्धातास योग साधनेचे प्रात्यक्षिक दिले.

कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या चार दिवसापासून संपूर्ण जिल्हयावर आपल्या व्यक्तिमत्वाचे आणि योग विद्येचे गारुड घालणा-या बाबा रामदेव यांना आभार पत्र देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. गेले चार दिवस त्यांचा सत्संग लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मेंदूचा मार्ग पोटातून जातो हे सांगणारे बाबा रामदेव हे एकमेव ऋषी असून आमच्या देशाच्या थोर ऋषी परपंरेचे शिर्षस्थ आहे. लाखो शेतक-यांच्या जीवनात बदल करण्यासाठी त्यांनी आपले जीवन राष्ट्राला समर्पित केले आहे. चार दिवसात आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील त्यांचे अमृत वचन या जिल्हयाला कृषीवर आधारीत उद्योग व योगातून उत्तम आरोग्य कमावणारा आदर्श जिल्हा म्हणून पुढे नेण्यास मदत करणारे आहे, असे स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाराष्ट्राच्या भूमित संत रामदास स्वामीपासून तुकडोजी महाराजापर्यंत क्रांती घडविणारी वाणी ऐकली आहे. मात्र यावेळी बाबा रामदेव यांनी आपल्या वाणीतून या जिल्हयातील शेतक-यांचे मोठया प्रमाणात प्रबोधन केले असून हा एक ऐतिहासिक क्षण म्हणून कायम जिल्हयाच्या लक्षात राहील. शेतक-यांनी त्यांनी सांगितलेल्या मार्गाने काही प्रयोग निश्चित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी वरोरा येथे वेळ दिल्याबद्दल आभार मानले. बाबा आमटे यांच्या ऐतिहासीक भूमित या ऋषीच्या वाणीतून शेती आणि आरोग्याच्या परिवर्तनाला सुरुवात होईल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेवी डॉ.विकास आमटे यांनी रामदेव बाबा यांचा आम्ही समानधर्मी या शब्दात सन्मान केला. जनतेच्या सेवेच्या विविध मार्गातून मार्गक्रम करीत असतांना रामदेव बाबांच्या योग विद्येचे त्यांनी कौतुक केले. आनंदवनला भेट देण्यासाठी ते येणार असल्याबद्दल आभार मानले. या सर्व कार्यक्रमाच्या स्वागतध्यक्षा असणा-या अर्जना नरेंद्र जिवतोडे यांनी प्रास्ताविकात रामदेव बाबा यांना थेट आवाहन करत या भागातील शेतक-यांच्या उत्पादनाला आपल्या व्यवसायाच्या मार्फत उत्तम भाव मिळवून दयावा, अशी मागणी केली.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्टये म्हणजे महात्मा ज्योतीबा फुले यांचे शेतक-यांचे आसूड व संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगिता या पुस्तकांची भेट बाबा रामदेव यांना सत्कारात देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांना नांगराची लाकडी प्रतिकृती भेट दिली. कार्यक्रमाचे संचलन एकता बंडावार व प्रशांत क-हाडे यांनी केले. या ठिकाणी शेतीच्या संदर्भातील विविध स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला वरोरा पंचायत सभापती रोहीणी देवतळे, पोंभूर्णा सभापती अल्का आत्राम, जि.प.सदस्य ज्योती वाकडे, विद्या किन्नाके, स्वाती वडपल्लीवार, खोजराम मरस्कोल्हे, रमाकांत लोधे, राहूल संतोषवार, कमलाबाई राठोड व नामदेव करमनकर, सेवानिवृत्त प्राचार्य एम.वाय.पालारपवार, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिवदास, कृषी विकास अधिकारी एस.एस.किरवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अ.ना.हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.विद्या मानकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व अन्य पदाधिकारी व मोठया संख्येने शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते. आभार प्रदर्शन लक्ष्मीनारायण दोडके यांनी केले.

About admin

Check Also

New Team of Office Bearers of OSN installed on Sunday

Nagpur, (AVT News Bureau) : The Installation Ceremony of the newly elected body of office …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!