Home / Trending / शेतकऱ्यांना सिंचन सोय करा ,शेतीला पानी द्या – शेतक-यांचा टाहो

शेतकऱ्यांना सिंचन सोय करा ,शेतीला पानी द्या – शेतक-यांचा टाहो

पाथरगाव सिंचन तलावाच्या मान्यतेवरून आजी-माजी आमदाराचा कलगीतूरा
चांदूर रेल्वे, (विजय खवसे) :
शेतकऱ्यांना आधी सिंचन व्यवस्था महत्वाची आहे मग ते कोणी केली याचे महत्व नाही. आमला कारला ,पाथरगाव,थुगाव ,सावंगी मग्रापुर या गावातील शेकडो शेतकरी वर्षानुवर्षे सिंचनापासून वंचित आहे. कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह करावा लागतोय. निसर्ग साथ देत नसल्याने येथील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. घरी आलेल्या मालाला बाजारात हमी भाव मिळत नाहीये. जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करने गरजेचे आहे. पूर्वी सदर पाचही गावे तिवसा तालुक्यात व विधानसभा क्षेत्रा मधील शेवटच्या टोकावर असल्याने राजकारणी नेत्यांनी या गावांकड़े विशेष लक्ष दिले नाही. मात्र चांदूर रेल्वे तालुक्यात व मतदारसंघामध्ये समाविष्ट झाल्यानंतर माजी आमदार स्व.डॉ पांडुरंग ढोले यांनी ही गावे सिंचनाखाली यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. आंदोलन देखिल केले. मात्र या गावाला कालवा मात्र आला नाही. त्यामुळे ही गावे आजही सिंचनापासून वंचित आहेत. जेव्हा अरुणभाऊ अड्सड हे आमदार व विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाले तेव्हा या गावांना भाऊची आशा होती कि ते कालवा या गावा कडून वळवतील मात्र कालवा कुरहा बोर्डा मार्गे होत धामनगावला गेला व हे पाचही गावे पाण्यापासून  वंचित राहीलीत. याला जवाबदार अरुण भाऊच असल्याचे येथील शेतक-यांकडून बोलल्या जातय. नंतर आमदार वीरेंद्र जगताप हे निवडून आले. त्यांनी या पाच गावाला सिंचनाची सोय कशी व्हावी यासाठी पाथरगाव सिंचन योजना राबविन्यासाठी प्रयत्न केला व त्यात त्यांना यश देखील आले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जगतापांचे भरभरून स्वागत केले व त्यांना पुन्हा आमदार केले. दोन्ही आमदार शेतकरी असल्याने शेतक-यांची जाणीव आहे परंतु भाऊने धामनगाव चे विशेष लक्ष दिले तर वीरेंद्र जगताप हे विधानसभेचे लक्ष ठेवतात असा सुर आहे.
मात्र आता दोन आजी माजी आमदारात श्रेयवादाची लढाई सुरु असून कलगीतूरा रंगत आहे. मात्र या कलगीतू-यात येथील शेतकरी भरडल्या जात आहे. पाण्यासाठी टाहो फोडतोय… पानी द्या…! पानी द्या …! आम्हाला पानी द्या…!
काय आहे लढाई वाचा :
एक पुरावा दाखवा आमदारकी सोडेन – आमदार वीरेंद्र जगताप 
चांदूर रेल्वे तालुक्यातील २ हजार १६३ हेक्टर क्षेत्राला वरदान ठरलेल्या पाथरगाव सिंचन योजनेला माजी आमदार अरुण अडसड यांनी आजवर विरोधच दर्शविला. असे असताना या योजनेकरिता त्यांनी पाठपुरावा केल्याचा दावा केल्या जात आहे. या दाव्याचे खंडण करीत पाच वर्षात माजी आमदार अरुण अडसड यांनी या योजनेकरिता केलेल्या पाठपुराव्याचा एक पुरावा दाखवावा, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असे आव्हान आमदार विरेंद्र जगताप यांनी केले. 
पाथरगाव सिंचन योजनेचे श्रेय माजी आमदार अरुण अडसड लाटत असल्याने आ.वीरेंद्र जगताप यांनी आजवर केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. अजित पवार जलसंपदामंत्री असताना २१ मे २००८ रोजी आ.वीरेंद्र जगताप यांनी याबाबत दिलेल्या पत्रानंतर २३ डिसेंबर २००८ रोजी राज्यमंत्र्यांनी बैठकीत याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. तसेच १३ जुलै २००९ ला शासन निर्णय काढण्यात आला. याचा पुढे पाठपुरावा करीत २ फेब्रुवारी २०१० व १३ एप्रिल २०१० रोजी मुख्यमंत्री यांना दिलेले पत्र. जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांचे याबाबत आ.वीरेंद्र जगताप यांना मिळालेले पत्र, जलसंपदा मुख्य अभियंत्याचे २९ नोव्हेंबर २०१० चे पत्र, २०११ चे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे पत्र, राज्यमंत्री सुनील तटकरे यांच्या पत्राचा पुरावा आ.वीरेंद्र जगताप यांनी यावेळी सादर केला.
आता भाऊ काय म्हणतात वाचा..
जगताप यांनी आधी राजीनामा स्टँम्पपेपरवर लिहुन द्यावा त्यानंतर पुरावे सादर करणार – मा. आ. अरूण अडसड
मला पुरावा मागणाऱ्या आ. जगताप यांनी मतदारसंघात कोणते मोठे काम केले ते आधी दाखवून द्यावे, त्यांना मतदारसंघाचा इतकाच कळवळा होता तर, त्यांची सत्ता असताना या योजनेला आजवर का मान्यता मिळाली नाही. शेवटी आमच्या सरकारनेच पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे याचे श्रेय आम्हाला मिळत असेल तर यात वावगे तरी काय आहे? असा टोला माजी आमदार अरुण अडसड यांनी लगावला. .
आजवर मी केलेल्या कामांची कधीच प्रसिध्दी केली नाही. पाथरगाव व परिसरातील गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. मी त्यांना सांगितले नाही. उरला पुराव्याचा प्रश्न, तर आमदारांनी राजिनाम्याचा इशारा दिला आहे. तो इशारा त्यांनी आधी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा, मग माझ्याकडे असलेले पुरावे त्यांना सादर करेल, असा दावा देखील अरुण अडसड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केला. अखेर आमचे सरकार आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांचे सरकार असताना आमदारांनी गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये एकही ठोस काम केल्याचे दिसून येत नाही, असा आरोप अडसड यांनी केला. त्यामुळे या आरोपात काहीच तथ्य नसून, मी श्रेयासाठी कधीच काम करीत नाही असे ही अरूण अडसड म्हणाले.

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!